पंचमहाभूत विकृतीतून जनपदध्वंश व्याधी : वैद्य विश्वंबर पवार निवघेकर यांचे समुपदेशन
नांदेड / विशेष प्रतिनिधी / प्रतापराव देशमुख बारडकर
आयुर्वेद शास्त्रानुसार पंचमहाभूत विकृत होऊन सृष्टीत विषमता निर्माण होऊन कोरोणा सारखे जनपदध्वंश व्याधी निर्माण झाला आहे. आयुर्वेदातील औषधी, पंचकर्म, आहार, विहार, योगासन, प्राणायाम, सकारात्मक जीवनशैली इ. गोष्टींचा अवलंब करून कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी उपाय असल्याचे समुपदेशन वैद्य विश्वंबर पवार निवघेकर यांनी केले आहे. जनसंपर्क सेवेत अहोरात्र जीवाची भीती न बाळगता कार्य करणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मोलाचा संदेश, जनजागृती अभियान, सामाजिक ऋणानुबंधातून राबविण्यासाठी पुढाकार घेतला असून रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोणा विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी मोलाचे प्रबोधन व उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.
आयुर्वेदातील ब्रम्हांडी ते पिंडी या तत्त्वानुसार निसर्गात आहे तेच शरीरात आहे. पंचमहाभूते पृथ्वी, जल, आकाश, तेज, वायू यांचे सृष्टीत विषमता निर्माण झाल्याने शरीरात देखील विषमता निर्माण झाल्याने कोरोणा सारखे जनपदध्वंश महामारी उदयास आली आहे. निसर्गात समानता आणणे तूर्तास तरी शक्य नसल्याने विषाणू संसर्ग टाळण्यासाठी आयुर्वेदातील औषधी, पंचकर्म. आहार, विहार, योगा, प्राणायाम, सकारात्मक जीवनशैली त्याचबरोबर शासन निर्बंधाचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चित कोरोना पासून बचाव केला जाऊ शकतो.
मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गंडूष, नस्य, धूमनस्य व औषधींचा वापर प्रभावी उपाय आहे. नस्यामध्ये वेखंड, केसर इ. औषधींचे तेल करून दोन्ही नाकपुडीत दोन दोन थेंब टाकल्यास नाकातील आंतरत्वचेची प्रतिकारशक्ती वाढते व तेथे स्निग्धता आल्याने काही अंशी विषाणू तेथे चिटकून त्याचे फुफ्फुसात जाण्यास प्रतिबंध होऊ शकतो. सर्वसाधारणपणे नागरिकांनी नस्य औषधी ऐवजी घरातील तूप किंवा खोबरेल तेलाच्या थेंबाचा वापर करता येईल. धुमनस्य म्हणजे नाकातून औषधी युक्त धूर घेणे होय. त्रिकटू, वेखंड, विडंग इ. औषधींचे मिश्रणाचे धुमनस्य घेतल्याने नाकातील निर्जंतुकीकरण करून श्वसनलिकेचे शुद्धीकरण होते. सर्वसाधारणपणे घरघुती हळदीचा धूर घेता येईल. गंडूष म्हणजे औषधीयुक्त काढ्याने किंवा तेलाने गुळण्या करणे होय. गंडूष औषधी मध्ये त्रिफळा, जेष्ठमध, खदिर इ. यांच्या मिश्रणातून तयार केलेले काढ्याने किंवा तेलाने दररोज सकाळी उठल्यानंतर गुळण्या केल्यास मुखातील व गळ्यातील आंतरत्वचेची प्रतिकारशक्ती वाढते तसेच गळ्यातील कफ, सलाइव्हा, सिक्रेषण इ. बाहेर पडल्यामुळे गळ्यामध्ये संसर्गासाठी फोकस किंव्हा सरफेस एरिया राहत नाही त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. सर्वसाधारणपणे नागरिकांनी घरातील मीठ मिश्रित कोमट पाण्याच्या गुळण्या केल्या तरी चालतात. रससिंदूर, अभ्रक, टंकन, प्रवाळ, शंख, सुंठी, गुडूची, लवंग, दालचिनी इ. औषधी वापरून फुफ्फुसाची प्रतिकारशक्ती वाढविता येते.
आहारांमध्ये भूक लागली तेंव्हाच जेवण करणे, रात्रीचे जेवण लवकर घेणे, हलके अन्न खाणे त्यामध्ये फळभाज्या, दाळी वर्ग, भाकरी, चपाती, फळे, दुध, तूप, ताक व ड्रायफ्रुट इ. वापर करणे. तसेच घरचे साधे व ताजे जेवण करणे. नियमितपणे योगा, व्यायाम केल्याने चांगली भूक लागून अन्नपचन व्यवस्थित होते. त्यामुळे शरीर लवचिक व मजबूत राहते. नियमित प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो त्यामुळे फुफ्फुस उत्तमरीत्या कार्यरत राहते. हा विषाणू फुफ्फुसाला संक्रमित करून कोरोणा व्याधी उत्पन करतो. त्यामुळे फुफ्फुसाला उत्तमरीत्या कार्यरत ठेवण्यासाठी कपालभाती, अनुलोम विलोम, ओमकार, भाम्बरी इ. प्राणायाम नियमित करणे आवश्यक आहे.
दैनंदिन वाढत्या ताणतणावात रात्रीला कमीत कमी आठ तास निवांत झोप घेणे आवश्यक आहे. तसेच सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. सोबतच शासनाने सांगितलेल्या मास्क, सॅनिटायझर, गर्दीत न जाने इ. नियमांचे व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.
वरील सर्व उपाय केल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे कोरोणा विषाणूंचा संसर्ग होण्यापासून बचाव होऊ शकतो. म्हणून सर्वांनी आयुर्वेदातील उपाययोजना केल्या व शासनाचे निर्देश पाळले तर निश्चितपणे कोरोणा संसर्ग होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो व आपले सर्व दैनंदिन काम आपण नियमितपणे करत कोरोना सोबत जगू शकू कारण कोरोना चा प्रादुर्भाव कधी संपेल हे सांगणे तूर्तास तरी शक्य नाही म्हणून आज घडीला आपल्याला कोरोना सोबत घेऊन त्यापासून बचाव करतच जगावे लागेल त्यासाठी आयुर्वेद औषधी चा वापर हा पर्याय आहे.
वैद्य विश्वंबर पवार यांनी वैद्यकीय आयुर्वेदिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचा घटक नात्याने व आपण समाजाचेद काही तरी देणे लागतो या सामाजिक भावनेने आपात्कालीन कोरोना बचाव अभियानासाठी पुढाकार घेतला आहे. जनसंपर्क सेवेत अहोरात्र वावरणाऱ्या पोलिस प्रशासनातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, पत्रकार, समाजसेवक याशिवाय विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तींना समुपदेशन करत आयुर्वेदातील औषधीचे मोफत वाटप करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा आगळावेगळा व स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वैद्य विश्वंबर पवार निवघेकर यांनी मोलाचा संदेश, जनजागृती, समुपदेशन अभियान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रभावीपणे राबवून कोरोना संसर्ग व्याधींपासून दूर राहण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यात मजबूत बांधकामाची घरे टिकून राहतात परंतु कच्ची घरे, झोपडी हे नष्ट होतात त्याचप्रमाणे कोरोना महामारीत देखील ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे व यदाकदाचित झालाच तर त्यापासून विनाउपद्रव बचाव करून बाहेर पडू शकतो. ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे व त्याचे विपरीत परिणाम होण्याची शकयता नाकारता येणार नाही.
असा मोलाचा सल्ला त्यांनी सर्व जनतेला दिला. कोरोना महामारीत घाबरून जाऊ नये तसेच धीर न सोडता सामूहिक लढा उभारण्याची गरज आहे. सात्विक गुणधर्म वाढविण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. कोरोणावर लसीचा शोध लागेपर्यंत कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेणे व त्यापासून बचाव करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (वैद्य विश्वंबर पवार निवघेकर : 9881166777)