मुदखेड तालुक्यातील शेतकरी रब्बी पीक स्पर्धेत जिल्हा स्तरावर चमकले

 रब्बी पीक स्पर्धेत : शेतीशाळेला यश

संपादक आशिष मुगटकर

    शेतीशाळेत कृषी सहाय्यक राम कपाटे यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करताना..


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पीक स्पर्धेत हरभरा पिकात जिल्हास्तरीय २ पुरस्कार पटकावले.

ही स्पर्धा रब्बी हंगाम २०२० मध्ये घेण्यात आली होती. त्यात वासरी येथील शेतकरी विठ्ठल नारायण लष्करे यांनीसुद्धा सहभाग घेतला होता. रब्बी हंगामात कृषी विभागाकडून लष्करे यांना ऊस विकास योजनेतून हरभरा बियाणे देण्यात आले होते व तसेच शेतीशाळेचे आयोजन सुद्धा त्यांच्याच शेतात करण्यात आले होते. शेतीशाळेत कृषी सहाय्यक राम कपाटे यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले‌. लष्करे यांनी शेतीशाळेतील मिळणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शन व स्वतःच्या अनुभवातून शिकून ऊस पिकामध्ये फुले विक्रम या जातीच्या हरभऱ्याची आंतरपीक म्हणून लागवड केली. यात त्यांनी बीज प्रक्रिया, पाणी, खत, कीड-रोग व तण व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब करून हेक्टरी ४७ क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन घेतले. 

यात विशेष बाब म्हणजे हरभरा हे आंतरपीक म्हणून घेतली असताना सुद्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्याच खालोखाल सीता बोरगाव येथील शेतकरी नरसिंह डुबेवाड यांनीसुद्धा हेक्टरी ४२ क्विं. हरभरा उत्पादन घेऊन जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला.

तसेच तालुका स्तरावर हरभरा पिकात हिस्सा पाथरड येथील शिवशंकर बोचरे यांचा प्रथम तर शंकर व्यवहारे डोंगरगाव व दिगंबर कदम मुगट यांचा अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक आला. या सर्व प्रगतशील शेतकऱ्यांचा १ जुलै कृषी दिनी प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. 

या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी मोकळे साहेब व कृषी अधिकारी सुनील पुरी आणि कृषी सहाय्यक अनुप मोरे, राजकुमारी देशमुख, व व्यंकटेश पाकलवार यांनी तंत्रिक मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या