मृदा दिनानिमित्त शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
दि.५.रोजी मुदखेड तालुक्यातील मौजे जवळा फाटक येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा मुदखेड यांच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती लक्ष्मणराव जाधव होते. प्रास्ताविकामध्ये तालुका कृषी अधिकारी सुनील पुरी साहेब यांनी मृदा दिन साजरा करण्याचे उद्देश सांगून जमिनीच्या आरोग्याचे पिक उत्पादन वाढीमध्ये तसेच मानवी आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व सांगितले. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी विविध प्रकारच्या सेंद्रिय खताचा वापर करावा तसेच माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
मंडळ कृषी अधिकारी वाघमारे साहेब यांनी विकेल ते पिकेल अभियान, स्मार्ट प्रकल्प व कृषी विभागाच्या योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कृषी सहाय्यक अनुप मोरे यांनी हळद पीक व्यवस्थापनातील स्वतःचे अनुभव सांगून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कृषी सहाय्यक राम कपाटे यांनी केळी पिकाचे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन तसेच ऊसामध्ये पिकाला पूरक असलेले आंतरपीक घेऊन त्यापासून निघणाऱ्या उत्पन्नावर ऊस पिकाच्या उत्पादन खर्चाचे नियोजन करण्यास सांगितले.
अध्यक्षीय संवादामध्ये लक्ष्मणराव जाधव यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून कृषी विभागाच्या सल्ल्याने खत तसेच कीड व रोगाचे नियंत्रण करावे असे आवाहन केले.
सूत्रसंचालन श्री धुमाळ साहेब यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक व्यंकटेश पाकलवार यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक श्रीमती रेशमलवार, श्रीमती देशमुख, श्रीमती शिंदे , श्रीमती हाटकर, श्रीमती शेख, संजय भिसे, अशोक मुंगल, आनंदराव उबाळे, विठ्ठल जाधव, बालाजी भोकरे, कृषी मित्र आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार तालुका तंत्र व्यवस्थापक गीते यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा