मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद
दि. १ : नांदेड जिल्ह्यातील भोकर ते रहाटी रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची लांबी २३ कि.मी. असून राष्ट्रीय महामार्गमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करुन हे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
मंत्रालयात भोकर ते रहाटी रस्त्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.चव्हाण बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उ.प्र. देबडवार, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभाग (कोकण) मुख्य अभियंता त.की. इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव श्री.जंजाळ, श्री.रहाणे, अधीक्षक अभियंता श्री.औटी यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, भोकर ते रहाटी रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे याबाबत जनक्षोभ निर्माण होऊन अनेक तक्रारी, निवेदने माझ्याकडे आली होती. नांदेड ते भोकर रस्त्याची परिस्थिती बिकट असून या कामासाठी बराच कालावधी गेला आहे. या कामामध्ये लक्ष घालून काम केल्यास ते लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. या रस्त्याचे संपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या कामाला पुन्हा मंजुरी देऊन निविदा काढण्यात यावी. कामास जानेवारीपर्यंत सुरुवात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा