अतिवृष्टीमुळे सोयाबीनला फुटले कोंब : तात्काळ पंचनामे करा व शेतकऱ्यांना मदत द्या - भगवानराव देशमुख

 संपादक आशिष मुगटकर
निवेदन :- सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तळणी मंडळामध्ये झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी.यासाठी हदगाव तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भगवानराव देशमुख व सोबत शेतकरी.

अतिवृष्टीमुळे शेतात बनले पाण्याचे तळे.
 सोयाबीन शेंगांना फुटले कोंब.

हदगाव/ तालुका प्रतिनिधी

हदगाव तालुक्यातील तळणी मंडळांमध्ये सततच्या अतिवृष्टी मुळे या खरीप हंगामातील उडीद, मूग व सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतात पाण्याचे तळे साचले असून उभ्या सोयाबीन पीकालाच कोंब फुटल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

तळणी परिसरात अतिवृष्टीमुळे व पैनगंगा नदी व ईसापुर धरण च्या विसर्गामुळे अनेक नदी नाली तुडुंब भरले आहेत. त्यामुळे सततच्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताला आता तळ्याचे रुप आले आहे. त्यामुळेच शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटलेली दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीचे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातचे निघून गेल्यात जमा आहे. 

शेतात पाणी :- सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तळणी मंडळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असे पाणी साचले आहे.त्याच पाण्यातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटलेले पाहताना शेतकरी.
या वर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवात ही बळीराजाला संकट घेऊनच आली. शेतकऱ्यांना बोगस बियाणामुळे अनेकांची सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा सोयाबीनची पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी जवळचे पैसे संपल्यावर उसनवार पैसे घेऊन ही पेरणी केली आहे. पण आज सोयाबीन काढणीच्या वेळी हातचे आलेली हे पीक पाण्याने गेल्यामुळे या हंगामात बळीराजा चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

या परिसरात दरवर्षी सोयाबीनचा उतारा  एकरी नऊ ते दहा क्विंटल येत असतो पण यावर्षी शेतकऱ्यांला एकरी एक, दोन क्विंटल तरी  उतारा निघेल की नाही यात तीळ मात्र शंका नाकारता येणार नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून आर्थिक संकटात सापडला आहे.

 शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी भगवानराव देशमुख(.अखिल भारतीय शेतकरी विकास संघटना मराठवाडा विभाग प्रमुख किसान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ) व त्याच्या शिष्टमंडळाने कृषी अधिकारी हदगाव यांच्याकडे केली आहेत. यावेळी शंकरराव तावडे, बबनराव जारडे, प्रशांत तावडे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या