मुदखेड तालुका प्रतिनिधी
मौजे डोंगरगाव (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील विनाअनुदानित शेती शाळेअंतर्गत सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन आणि 'महाविस्तार ॲप' चा उपयोग या विषयांवर माहितीपूर्ण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
या शेती शाळेत खोडमाशी व चक्रीभुंगा या सोयाबीन पिकाच्या मुख्य कीड समस्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या किडीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येत असून, त्यावर योग्य वेळी उपाय योजना न केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कीडींची ओळख, जीवनचक्र, होणारे नुकसान आणि नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
त्याचबरोबर 'महाविस्तार AI ॲप' विषयी माहिती देण्यात आली. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, आणि विविध कृषी योजनांची माहिती सहजपणे मिळवू शकतात. ॲपचा प्रभावी उपयोग करून शेतकरी अधिक शास्त्रीय पद्धतीने शेती करू शकतील, असे मार्गदर्शकांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला आणि पहिली फवारणी जैविक कीटकनाशकाची करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणपूरक आणि आरोग्यास सुरक्षित अशा जैविक पद्धतींचा अवलंब करण्याची तयारी शेतकऱ्यांमध्ये दिसून आली, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
या कार्यक्रमास गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मार्गदर्शक म्हणून श्री आर. के. कपाटे (उप कृषी अधिकारी) व श्री. व्यंकटेश पाकलवार (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी कीड नियंत्रणासाठी शिफारसी, जैविक व रासायनिक उपाय, योग्य फवारणीचे वेळापत्रक याबद्दल माहिती दिली.
हा उपक्रम शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा