तालुका प्रतिनिधी
उमरखेड -' विदर्भातील ज्येष्ठ लेखक डॉ.प्र.भा.काळे यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली असून ग्रामीण माणसाचे हुबेहूब दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते.खेड्यात खूप कर्तबगार माणसं आहेत परंतु त्यांच्या कार्य कर्तृत्वाची फारशी दखल घेतली जात नाही.आपल्या अवतीभोवती असलेल्या मोत्यासारख्या माणसांचा शोध घेऊन त्यांना शब्दशिंपल्यात कोंदण्याचं काम अत्यंत लालित्यपूर्ण आणि प्रभावी भाषेत लेखकाने केले आहे,'असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांनी डॉ.प्रकाश काळे लिखित शिंपल्यातील मोती या पुस्तकाचे प्रकाशन करताना काढले.येथील जिजाऊ सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.नारायण शिंदे (नांदेड) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अँड.माधवराव देवसरकर, शिवाजीराव माने,प्राचार्य डॉ.वि.ना.कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आरंभी लेखक डॉ.प्रकाश काळे यांनी प्रास्ताविक केले.आपल्या सभोवताली वावरणारी माणसं हा आपल्या लेखनाचा केंद्रबिंदू असून तीच आपली प्रेरणा आहे,असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अँड.देवसरकर,माने आणि प्राचार्य डॉ.कदम यांनी समयोचित विचार मांडून लेखकाला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा.नारायण शिंदे यांनी काळे यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये विशद केली.प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाशी समरस होऊन लिहिल्यामुळे वाचकांच्या मनाची हे लेखन सहज पकड घेते.अस्सल ग्रामीण अनुभव असे या लेखनाचे स्वरूप आहे.अशा शब्दांत शिंदे यांनी लेखनाचे कौतुक केले.यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. शिंदे गुरूजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाला उमरखेड परिसरातील रसिक,श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा