नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न!
नांदेड / जिल्हा प्रतिनिधी
दि. २४ रोजी मंगळवारी नांदेड शहराच्या तरोडा भागातील भक्ती लॉन्स या ठिकाणी नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांतील काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचत पक्ष वाढीसाठी सामुहिक प्रयत्न केल्यास येणाऱ्या काळात काँग्रेसला पुन्हा गत वैभव मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, पक्षाचे मराठवाडा प्रभारी संपतकुमार, अभय छाजेड, काँग्रेसचे विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजीमंत्री डी. पी. सावंत, चंद्रकांत हंडोरे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहन हंबर्डे, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, विनायक देशमुख आदींची उपस्थिती होती.
एच. के. पाटील म्हणाले, की काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या कांही महिन्यात आंदोलने केली आहेत. या समवेतच पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढेही कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे, विविध विषयांबाबतची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. यातून आगामी काळात काँग्रेसला गतवैभव मिळेल आणि आगामी निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाने अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्ता मिळविली आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळात केवळ थापा मारण्याचे काम सुरु आहे. प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख, दरवर्षी दोन कोटी रोजगार तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, यातील एकाही आश्वासनाची मोदी सरकारने पूर्तता केली नाही. कोरोना काळात देशातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यातही सरकारला अपयश आले आहे. तर लसीकरण पाहिजे त्या गतीने राबविले जात नाही. भाजपाचे सरकार असलेल्या राज्यात आरोग्य सुविधा अभावी कोरोना झालेल्या अनेकांचा मृत्यू झाला. मात्र, आपले अपयश झाकण्यासाठी कोरोना बाधितांच्या मृत्यूंची आकडेेवारी चुकीची दाखवण्यात आली आहे. चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक बनली आहे. बेरोजगारी व गरिबीत झपाट्याने वाढ होत आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी देशात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणे गरजेचे आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांतून पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वासही एच. के. पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. महाविकास आघाडी सरकाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब, दलित, आदिवासी यांच्या हितासाठी ज्या योजना राबविण्यात येत आहेत या योजनांची माहिती शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवावा. आपल्या परिश्रमातूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पक्षाला आपेक्षित यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
देशातील कोरोनाच्या स्थीितीवरुन क्रेंद्र सरकावर तोफ डागत गुजरात येथील नमस्ते ट्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा देशात शिरकाव झाला. कोरोनाचा प्रश्नही हाताळण्यातही केंद्र सरकारला आपयश आले. कोरोनाची रुग्ण संख्या घटत असतानाच पुन्हा देशातील विविध राज्यात विधानसभा निवडणुका झाल्याने पुन्हा कोरोनाचा फैलाव झाला. केंद्र सरकारचे हे अपयश तसेच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली कामे जनतेपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.
या वेळी ना. अशोकराव चव्हाण म्हणाले, की कार्यकर्त्यांनी नवीन ऊर्जा व ताकदीने पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत. संघटनात्मक बांधणीची कामे चांगली झाल्यास निवडणुकीत निश्चितच पक्षाचा रिझल्टही चांगला राहिल. यासाठी पक्षाची भूमिका स्पष्टपणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवावी. जिल्हास्तरीय व महानगरातील पदाधिकाऱ्यांनी बुथ कमिटीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे असल्याचेही ना. चव्हाण यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. आरक्षण मिळावे हीच सरकारची भूमिका आहे. मात्र आरक्षणातील 50 टक्यांची मर्यादा वाढविल्याशिवाय आरक्षण मिळणे कठीण आहे. यासाठी केंद्र सरकराने 50 टक्के मर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणासाठी संसदेत महाविकास आघाडीच्या खासदारांनी आवाज उठविला मात्र मराठवाड्यातील एकाही भाजपच्या खासदारांनी या विषयावर मते मांडली नसल्याचा आरोप ना. अशोकराव चव्हाण यांनी केला.
या वेळी ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, की कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्कचा वापर प्रभावीपणे करत ज्वलंत विषयावरील काँग्रेसची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोचवावी. पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बुथ, सेल व शासकीय समितीत संधी देणे गरजेचे आहे. सर्व समान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेचा केंद्र सरकारकडून भ्रमनिराश झाला आहे. यामुळे आगमी काळात पक्षासाठी चांगला आहे. आपल्या सगळ्यांच्या सामुहिक प्रयत्नांनी पक्षाला निश्चितच यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, गत भाजप सरकारच्या काळात जितके काम करण्यात आले त्यापेक्षा अधिक काम या सरकारच्या काळात झाले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष म्हणून ना. अशोकराव चव्हाण यांनी सर्वपक्षीय बैठका घेतल्या. तसेच मराठा समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी तळमळीने काम केले. त्यांच्या या कामाची नोंद इतिहासात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, शिवाजीराव मोघे आदीनींही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायकराव देशमुख यांनी केले.
सूत्रसंचालन प्रवक्ता संतोष पांडागळे यांनी केले. उपस्थितांचे आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चारही जिल्ह्यातील पक्ष कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास चारही जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.


Hindu party gosot kra jay shree Ram nara dya nahi tar 70 sal aaram kra congress mukt Bharat. B . J . P jay shree ram
उत्तर द्याहटवा