नामांतर हुतात्मा अभिवादन सभा संपन्न
राज्यभरातील आंबेडकरी विचारवंतांनी जागविल्या नमांतराच्या दाहक आठवणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
- छत्रपती संभाजी नगर येथील मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी हुतात्मा जनार्दन मावडे, गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण आंबेडकरी समाजाने ठेऊन संगठित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक आर. बी. मादळे यांनी केले. हुतात्मा नामांतर स्मारक समिती नांदेडच्या वतीने आयोजित नामांतर हुतात्मा अभिवादन सभेत अध्यक्षीय पदावरून आर. बी. मादळे बोलत होते. यावेळी विचार मंचावर अरुण गाडे (नागपुर), डॉ. संजय अपरांती, दिगंबर मोरे, अशोक ढोले, माधव जमदाडे, इंजिनिअर भरत कुमार कानिंदे
श्याम निलंगेकर आदींची उपस्थिती होती.
शहरातील ताज पाटील हॉटेल येथे रविवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता नामांतर हुतात्मा अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलताना आर. बी. मादळे म्हणाले की, छत्रपती संभाजी नगर येथील मराठवाडा विद्यापीठाला शासनाने महामानव डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राज्यातील आंबेडकरी जनतेने राज्य शासनाकडे केली. त्यानुसार तत्कालीन राज्य सरकारने २७ जुलै १९७८ रोजी नामांतर झाल्याचा ठराव जाहीर करूनही सवर्णांनी संपूर्ण राज्यात जाळपोळ सुरू केली आणि मागासवर्गीय समाजाची घरे जाळली आणि आंबेडकरी समाजाच्या नामांतराच्या मागणीला विरोध केला. हे नामांतर आंदोलन सतत १७ वर्षे चालले. यामध्ये आंबेडकरी युवकांचे बळी गेले, अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली. तसेच हुतात्मा जनार्दन मावडे, गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे यांनी बलिदान दिले. तेंव्हा कुठे राज्य शासनाने १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला. नामांतर शहिदांच्या बलिदानाचे स्मरण ठेऊन समाजाने संघटित होणे गरजेचे आहे असे आर. बी. मादळे म्हणाले.
यावेळी काकासाहेब डावरे, भिमराव भुरे, आर. एन. गाजभारे, चंद्रकांत ठाणेकर, मारुती साळवे, टी.पी. वाघमारे, ईश्वर सावंत, विवेक मवाडे, सोनटक्के आदींनी नामांतर काळामध्ये नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला कसे मुठीत जीव धरून जगावे लागले यासह लढ्याच्या दग्ध आठवणींची माहिती उपस्थित आंबेडकरी जनतेला दिली. सुरुवातील तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातले. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आंबेडकरी समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्र संचालन प्रा. अविनाश नाईक यांनी तर आभार प्रा. इंगोले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा