अमरनाथ आणि हिमशिखरे एक अद्भूत प्रवासवर्णन
जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन ।
तरि देवतीर्थ भजन न सांगिती ॥
भूतळीची तीर्थे पहावी नयनीं ।
असे आर्त मनी विष्णुदासा ॥
तुझियां संगतीचे नित्य सुख घ्यावें ।
सार्थक करावे संसाराचे ॥
ऐसी ही उत्कंठा बहुत माझे पोटी ॥
सौ.मंगला देविदास फुलारी लिखित ‘अमरनाथ आणि हिमशिखरे’ या प्रवास वर्णनात वरील संत नामदेवांनी सांगितलेल्या ‘तीर्थावळीची’ आठवण येते कारण प्रस्तुत प्रवास वर्णनात लेखिकेची अमरनाथला जाण्यासाठी मनात असलेली उत्कंठा, संसारातील अनेक अडी-अडचणी, प्रवासाला निघण्यापूर्वीपासूनची तयारी- यात्रेला जाऊन आलेल्या मित्र-मैत्रिणीची मत-मतांतरे, अमरनाथ येथील वातावरणाची चित्तथरारकता आणि अनिश्चितता याबद्दल लेखिकेच्या मनातील घालमेल, भावनिक ओलावा प्रस्तुत वर्णनातून स्पष्टपणे उमटतो. बाबा बर्फाणीच्या वाटेवर लेखिकेने भोले अमरनाथ यांच्या दर्शनाला जाताना, पालखीवाले, घोडेवाले, खेचरवाले यांचे वर्णन करताना, तेथील स्थानिक लोकांना मिळणार्या रोजगाराचे वर्णन केले आहे. अमरनाथ गुहेकडे जातानाच्या पहेलगाम ते अमरनाथ गुहा आणि बालताल ते अमरनाथ गुहा येथील मार्ग कशा पद्धतीने निसर्गसौंदर्याची उधळण करतात. तेथील अरूंद रस्ते, खोलदर्या, बर्फाने अच्छादलेल्या पर्वतरांगा, हिमनद्या, धबधबे, पालखीवाल्याने वेळोवेळी दिलेल्या धोक्याच्या सूचना, जीव मुठीत घेऊन केलेल्या प्रवासाने श्री अमरनाथ स्वामीच नव्हेतर तेहतीस कोटी देव आठवल्याची कबुली लेखिका देतात. त्यानंतर श्री अमरनाथ स्वामींचे दर्शन झाल्यावर मिळणारी आत्मशांती, दिव्य अनुभव ही लेखिकेने वेगळ्या हातोटीने व्यक्त केलेले आहे. या पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे
“दिल सच्चा कर्म अच्छा
बाकी सब शिव की इच्छा”
अशा अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, मुहावरे आणि Phrase नी पुस्तक अधिक रंजक झाले आहे. प्रवास करत असता लेखिकेने भारताच्या सैनिकांनी वेळोवेळी केलेली मदत, कर्तव्यपरायणता त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत, प्रस्तुत यात्रा वर्णनात लेखिकेने ईश्वराचे आभार मानलेले आहेतच पण त्या सोबत महादेवाची भक्ती करणारे त्यांच्या पूर्वजांचे पण आभार व्यक्त केले आहेत. यातूनच लेखिकेची धार्मिकवृत्ती, अगदी मनोभावे श्री महादेवाची केलेली पूजा-अर्चना याचाही उल्लेख आहे. श्री अमरनाथ स्वामीचे दर्शन घेऊन येताना अर्ध्या वाटेवर दिसलेले पती देविदास फुलारी सर थकलेला, घामाघुम चेहरा, खुर्चिवरून घसरल्यामुळे झालेली जखम, याहून पती देवीदास फुलारी विषयीची काळजी पण अतिशय संवेदनशीलच मनाने केली आहे.
प्रेमाचे प्रतिक असलेली श्रीनगर मधील ‘शालिमार वाटिका’ मुघल बादशाहा जहाँगीरने आपली पत्नी नूरजहाँसाठी निर्माण केलेला बगिचा. हे खरे काश्मीरचेच नव्हे तर पृथ्वीचे स्वर्ग आहे. येथील बगिच्याचे दिवान-ए-आम, दिवाण-ए-खास आणि जनाना गार्डन यांचे अतिशय मनोहरी वर्णन लेखिकेने प्रवास वर्णनात केले आहे. नयनरम्य मनमोहित करणारी वाटिका म्हणजे ‘निशात वाटिका’ येथील कारंजे, विविधरंगी फुले, फळे, फेणधवल शुभ्रपाणी, पायऱ्या-पायऱ्याची बाग, वृक्षांच्या दुर्लभ प्रजाती, गगनचुंबी चिनार वृक्ष यांचे वर्णन आढळले.
कालव्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असणारे इटालितील व्हेनिस शहर, व श्रीकृष्णाची द्वारका याची आठवण आपण केलेल्या दल सरोवराच्या वर्णनावरून येते. दल सरोवरात वस्ती वसलेली आहे. प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी लिहिलेले बाबा बर्फाणी हे गीत मनाला खूपच भावते. निसर्गरम्य गुलमर्ग आणि गंडोला रोपवे ठिकाण समुद्रसपाटीपासून 13500 फुट उंचीवरील ठिकाणाचे वर्णन केले आहे. लेखिका सौ.मंगला फुलारी यांनी अत्यंत सरळ, साध्या आणि प्रमाण भाषेत लिहिले असल्यामुळे पुस्तकाच्या प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत संबंध यात्रा आणि यात्रा करत असताना त्याला आलेले अनुभव डोळ्यांसमोर उभे राहतात. लिहण्याची शैलीदेखील अनौपचारिक असल्यामुळे वचकाला कुठलं दडपण येत नाही. कदाचित याच शैलीमुळे यात्रेत अनेक अडचणी आल्या तरी त्यांना वैतागून न जाता त्यांना धीराने तोंड कसे द्यावे याचे छोटेखानी मार्गदर्शन सुद्धा झाले.
माता वैष्णवी देवीच्या रूपाचे, मूर्तीचे दर्शन करत-करत माताराणीच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीचे वर्णन मनमोहक पद्धतीने केले आहे. लेखिकेने प्रस्तुत प्रवास वर्णन 11 प्रकरणात लिहिले आहे. टिपलेल्या रंगित क्षणचित्रामुळे पुस्तकाला जीवंतपणा आला आहे. सौ.मंगला देवीदास फुलारी लिखित ‘अमरनाथ आणि हिमशिखरे’ प्रवास वर्णन या पुस्तकाचा पुस्तक परिचय, पुस्तकाचे प्रकाशन इसाप प्रकाशनचे श्री दत्ता डांगे यांनी केले आहे.
पुस्तकाचे मुल्य केवळ 200 रू. आहे. पुस्तकाची मांडणी आणि सजावट विजय चित्तरवाड यांनी केली असून पुस्तकाला न्याय देणारे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी साकारले आहे आणि अक्षर जुळणी दामोदर गुट्टे यांनी केली आहे हे पुस्तक निश्चित वाचनिय झालेले आहे. वाचक निश्चितच भरभरून दाद देतील. पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 26.12.2023 रोजी नियोजन भवन नांदेड येथे होणार आहे. त्यानुषांगाने अभिप्राय.
डॉ.माणिक गाडेकर.
सहशिक्षक
राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड.
मो.8830092902

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा